Skip to main content

अजराज अजिंक्य 'युवराज'

अजराज अजिंक्य 'युवराज'

क्रिकेट बोटावर मोजणाऱ्या अवघ्या काही देशात खेळला जातो पण या खेळाने इतके उतुंग अवलीये दिले आहेत ज्यामुळे खेळाचे श्रेष्ठत्व अबाधित राहिले आहे. काळानुरूप प्रकार बदलणाऱ्या या खेळाने माचो, जेटलमन, पुस्तकी किडे, पुस्तकाच्या बाहेर 360 विश्व दाखवणारे, पारंपरिकता जपणारे अनेक लेजन्ड दिले आहेत त्यात संख्येने कमी असणाऱ्या डावखुऱ्यांचा वाट कणभर जास्तच. डावखुऱ्या फलंदाजांना निसर्गतः एक विशिष्ट देणगी लाभली असावी कारण जेवढे स्टायलिश फलंदाज मोजु त्यात प्राधान्याने डावे आले. अगदी धुतलेल्या तांदळात खडे काढावे तितकेच स्टायलिश उजवे मिळतील. आक्रमकता, अविश्वसनीय फटक्यांची खाण बहुदा डाव्यांच्या ओंजळीत टाकताना देव मधुर रसपान करत असावे. अगदी सर गॅरफील्ड सोबर्स पासून, कलाईव्ह लॉयड, अॅलन बॉर्डर, डेव्हिड गोव्हर, ब्रायन लारा, विनोद कांबळी, सनथ जयसूर्या, ऍडम गिलख्रिस्ट, कुमार संघकारा, सईद अन्वर, आपला दादा, बेव्हन अशी कितीतरी नावे आहेत. महानतेच्या बाबतीत नक्कीच सचिन लारा पेक्षा श्रेष्ठ असेल पण लाराच्या खेळाने चक्षु कणभर जास्तच तृप्त होतील. अशा या डाव्यांच्या माळेत भारताचा एक मोती ठाण मांडून होता. भलेही त्याच्या कडे लाराच्या तोडीची नजाकत नसेल पण त्याच्याकडे जी जिद्द होती ती किंबहुना काकणभर सरसच. त्याला कोणी पाय चकर म्हणून हिनवले किंवा त्याच्या खेळातील तंत्राचा उपहास केला पण त्याने मात्र आपला ऍटीट्युड बदलला नाही. उलट त्या शब्दांची त्याने किंमत वाढवली. कदाचित त्याने प्रतिभेएवढा उच्च खेळ केला नसेल किंवा त्याच्यासोबत घडणाऱ्या घटनांनी त्याच्यातील अंकुर ऐन मध्यावर आलेले असतानाच मुरजून टाकले पण म्हणून त्याने खेळलेल्या खेळाची किंमत कमी होत नाही उलट तो जेवढा खेळला तेवढाच उजळला. काल त्याने निवृत्ती घेतली, आणि माझ्याही पापण्या अलगद ओलसर झाल्या. माझा आवडता खेळाडु नव्हता म्हणून काय झाले पण माझ्या आवडत्या खेळतला तो एक महान आयकॉन होता. एका ओव्हर मध्ये सहा सिक्स मारणार तो जगातला केवळ दुसरा अवलिया होता आणि 28 वर्षानंतर देशाला विश्वकप देताना प्राणयातनांना पण भीक न देणारा तृप्तऋषी नव्हे तर आणिक काय तो!!
ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2000 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी चा उपांत्यपूर्व सामन्यात भारताचा स्कोर 18.4 ओव्हर्स मध्ये 90/3 झालेला. त्या वेळी एन्ट्री झाली ती आपली पहिली इंनिंग खेळायला आलेल्या युवीची.  देखण्या युवराज ने आपल्या चौथ्याच बॉलवर इयान हार्वेला कव्हर ड्राईव्ह मारली आणि अप्रतिम अशीच आरोळी आली. त्याने त्या सामन्यात वर्ल्ड क्लास ऑसी बॉलिंगचा धुव्वा उडवत समानाविराचा 'किताब मिळवला. पण कामगिरीत सातत्य न राखता आल्याने अल्पावधीतच तो संघाबाहेर गेला. पुढचे दोन वर्षे तो आत मध्येच करत राहिला आणि अखेरीस 2002 च्या झिम्बाब्वे सिरीजमध्ये 2-1 ने मागे पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघात त्याची फेर निवड झाली ती संधीचे सोने करण्यासाठी. त्यानंतर त्याने मागे वळून पहिलेच नाही (कॅन्सर चे निदान होईपर्यंत).
'02 ला ICC CT गाजवली ती आपल्या अफलातून क्षेत्ररक्षणाने. पॉइंटला युवी आणि कव्हरला कैफ फिल्डिंग करताना हमखास वीस धावा वाचवायचे. 02 ची नेटवेस्ट, 03 चा पाक विरुद्धचा वर्ल्ड कप सामना, 2004, 2006 ची पाक सिरीज, 2008 ची चेन्नई टेस्ट अश्या कितीतरी खेळया आहेत ज्या आमच्या आजही डोळयात साठवल्या आहेत. पण खरा युवराज दिसला तो 2000, 2007 आणि 2011 च्या वर्ल्डकपमध्ये. ब्रॉडला मारलेले सहा सिक्स असो, सेमिफायनल मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित्त करणारी ती इंनिंग असो किंवा आपल्या अष्टपैलू खेळाने आजारी असताना सुद्धा देशाला मिळवून देणारा विश्वकप असो तो एखाद्या योद्याप्रमाणे लढला आणि जिंकला.
सुसाट वाऱ्यासारखा त्याचा स्ट्राईकरेट सेहवाग सारखा नसेल किंवा आवरेज धोनी सारखे नसेल पण तो या आकड्यांच्या पलीकडे यशस्वी ठरला अश्या कितीतरी खेळया खेळल्या ज्याने त्याचे ध्रुवपद एक माचो आणि सर्वांचा लाडका क्रिकेटर या बिरादीने सिध्द झाले.
कारकीर्द तशी झिगझाग अशीच राहिली त्यात 2014 चा श्रीलंके विरुध्दचा फायनल असो नाहीतर IPL असो त्यात युवराज नावाने राज नाही केले. 2017 ला इंग्लंड विरुध्द दीडशे धावा करताना त्याने धोनी सोबत केलेली भागीदारी पाहून युवराज आणखी काही वर्षे खेळेल ही आशा जागली पण ती अल्पजीवी ठरली. कारण त्यानंतर तो फारसे खेळला नाही. 2011 नंतर झालेल्या कर्करोगाला युवराज नावाच्या माणसाने हरवले पण त्यासाठी युवीच्या खेळाचे आणि फिटनेसचे बलिदान दयावे लागले.
एक अविश्वसनीय क्षेत्ररक्षक, आकर्षक फलंदाज, आणि कामचलाऊ गोलंदाज हीच त्यांची व्याख्या ठरेल तर T20 मध्ये ब्रॉडला मारलेले सहा सिक्स ही त्याच्या कारकीर्दीची हेडलाईन ठरेल. आता तो रिटायर झाला आहे  UVCan द्वारे कर्करोगावर मात करणाऱ्यांसाठी तो मदत करेल कारण खेळाडू म्हणून लढवय्या असणारा युवराज माणूस म्हणून अजिंक्य' अजराज असेल.

तुझाच कट्टर नसला तरी 'आपला' असणारा चाहता

               गोरोबा कानगुले

Comments