Skip to main content

आठवणीतला दादा

''आठवणीतला दादा''
. - गोरोबा संभाजी कानगुले

99 च्या वर्ल्डकप चा हंगाम होता, त्यात आज आपली भिडत श्रीलंकेसोबत आमच्या पिताश्रींना व दत्ता आण्णाला क्रिकेटचा थोडाफार नाद असेल पण तसेही क्रिकेट वर्ल्डकपच्या मेचेस भारतात सर्वत्र पाहिल्या जातात त्यासाठी क्रिकेटचे वेड असण्याची गरज नाही. त्यावेळी मला फक्त दोनच नावे माहीत होती दोन S, एक अर्थात सचिनचे तर दूसरे नाव 'प्रिन्स ऑफ कोलकता' गांगुलीचे. पुढे त्या सामन्यात काय घडले ते सर्वश्रुतं आहे. दुसऱ्या दिवशी शाळेत रात्री घडलेल्या Match ची इस्तंभुत कहाणी अन गांगुलीचा 183 धावांचा पराक्रम स्वतः गांगुली असल्याच्या थाटात सर्व मित्रांना रंगवून सांगितला. त्यावेळी मला द्रविड तितकासा ज्ञात नव्हता किबंहुणा द्रविडचे योगदान समजण्याइतपत मी मोठा झालो नव्हतो. अन माझा Hero झाला 'महाराजा गांगुली'.
स्नेहशीष या त्याच्या भावामुळेच दादा क्रिकेटमध्ये आला. तो स्वतः डावखुरा असल्यामुळे त्याचे अनुकरण उजव्या हाताच्या सौरवने केले अन भारताला मिळाला आजतागायतचा सर्वोत्तम 'Lefty Batsman'. 1992 ला सौरव भारतीय संघात आला (फक्त नावाला) पण कर्तुत्वापेक्षा गाजला तो वादामुळे. खरं तर वाद अन गांगुली यांचे नाते टॉम जेरी सारखे कायम एकत्र. पट्या एका सामन्यानंतर संघाबाहेर फेकला गेला कारण काय तर वरिष्ठ खेळाडुंना ड्रिंक दिली नाही म्हणे. काय म्हणाला असेल ठावूक आहे? 'माझ्या घरी असली कामे नोकर करतात' (खरे खोटे देव जाणे बहुदा अफवा असावी.) त्यानंतरची चार वर्ष परीश्रमाणे डोमेस्टिक क्रिकेट खेळला अन परतला 96 च्या इंग्लेंड दौरयात 'मैदानावर महाराजा होऊन'. काय अप्रतिम खेळला सलग दोन डावात दोन शतके. जणु 150 वर्षाच्या पारतंत्र्याचा सगळा राग एकदम काढायचा होता.
पुढे सहारा कप मध्ये पाकविरुध्द सलग चार सामन्यात सामनावीर, आजपर्यंत असा पराक्रम कोणीच केला नाही. त्याच्या ऑफसाईड च्या देखण्या शॉटस ना पाहुन द्रविडने त्याला 'God of offside' असे म्हटलेले. 98 च्या Independence cup च्या फाइनल मध्ये पाकच्या तगड्या बोलिंग विरुध्द 315 धावा चेस करताना गांगुलीने जी जिगर दाखवली ती अवर्णनीय. चांगल्या 124 धावा चोपल्या (A World record chase at that time) भारताने पहिल्यांदा तीनशे धावा चेस केल्या. अन तिथुनच सुरू झाला भारतीय क्रिकेटचा नवा प्रवास. 2000 च्या वर्ल्ड फेमस स्कँडल नंतर दादा कर्णधार झाला अन त्याच वर्षी CT च्या फाइनल मध्ये किविजविरुध्द आणखी एक शतक मारले (फाइनल मध्ये सलग तीसरे शतक) दुर्दैवाने आपण ती match हरलो पण परदेशात शेळी असणारा आपला संघ आता शिकार करायला लागला होता निदान तोडीस तोड उत्तर देण्याचे सामर्थ्य आता येत होते.
फक्त मैदानावरच नाही तर गांगुलीने मैदानाबाहेर पण आपला सताडबाणा सोडला नाही. 2001 ची ऑस्ट्रेलिया विरुध्दची टेस्ट सीरिज मध्ये द्रविड-लक्ष्मणच्या त्या कोलकत्याच्या मॅरॅथॉन खेळीइतकीच प्रसिध्दी चार वेळा toss साठी उशीरा येत गांगुलीने मिळवली(स्टीव वॉ ला ताटकळत ठेवण्यासाठी मुद्दामहून यायचो असे नंतर त्याने कबुल केले) अँड्रु फ्लिन्टौफ्फ एकदा म्हणाला की गांगुली हा प्रिन्स चार्ल्स पेक्षा जास्त गर्विष्ट आहे मग 2002 च्या नट्वेस्ट फाइनल मध्ये शर्ट काढून त्याने त्याला थाटात उत्तर दिले (Flintoff च्या वानखेडे ड्राम्याला तो सडेतोड जवाब होता). गांगुली-चॅपेल वादाविषयी तर न बोललेलेच बरे, झाली तेवढी हानी पुष्कळ आहे. मी तर म्हणेल सचिन धोनी प्रमाणे गांगुलीवर पण एक चित्रपट यायला पहिजे, सचिन धोनी पेक्षा जास्त मसाला असेल त्यात अन सोबत 'नगमा Effect'.
2007 च्या वर्ल्डकपनंतर सीनियर खेळाडु रिटायर व्हावेत म्हणुन प्रचंड दडपण येत होते, इथे पण दादाच पुढे झाला.(लीडरशिप हा त्याचा जन्मजात गुण असावा....कायम पुढे) शेवटच्या डावात शून्यावर बाद झाला पण रिटायर झाला तो भारतीय संघाचा कर्णधार म्हणुनच (Thanks to MSD for giving chance to DaDa for captaincy).
पुर्ण वादळी कारकिर्द होती त्याची आता पण वाद आहेतच की (नुकताच शास्त्री सोबतचा) पण सध्या तो Bengal Cricket Association चा president आहे. भारतीय अन आशियाई क्रिकेटला पुढे न्यायचे असेल तर ICC चा पण president गांगुली व्हायला हवा कारण गोऱ्यांची कशी जिरवायची हे त्याला मैदानाइतकेच मैदानाबाहेर पण माहिती आहे.
आज तो 44 वर्षाचा होतोय पण त्याच्यात आणखी तीच जिगर आहे. त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.
#HappyBirthdayDada..

Comments