Skip to main content

टाय पे टाय 'अँड थ्रो टू द विनर'


14 जुलै 2019, नेहमीप्रमाणे एकमेकांवर कुरघोडी करण्यात जगातील राष्ट्रे गर्क होती पण इंग्लंड दोन ऐतिहासिक अदभुत अविश्वसनीय आणि अतर्क्य आशा फायनलचे साक्षीदार होणार होते. टेनिस आणि क्रिकेट समर्थक सोडले तर बाकीच्यासाठी हा नॉर्मल दिवस पण ह्या दोन खेळासाठी हा 'गोल्डन डे' होता. एकीकडे पहिल्या विश्वकप साठी लॉर्ड्सवर ब्रिटन न्युझिलंड झुंजणार होती तर वर्ल्ड नंबर वन जोको विरुध्द 38 वर्षाचा तरुण!! फेडरर आपल्या विक्रमी एकविसाव्या ग्रँडस्लॅम साठी खेळणार होता।।।

काल पर्यंत अफ्रिका ऑस्ट्रेलिया चा 99च्या सेमिफायनलचा थरार असो अथवा 06 चा वांडरर्स वरील वंडर असो या दोन सामन्यांना इतिहासातील सर्वोत्कृष्ट सामने म्हणून क्रिकेट फॅन्स कधीच नाकारु शकत नव्हते. पण हो फक्त काल पर्यंतच!! शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या चेंडुपर्यंत श्वास रोखणाऱ्या या खेळाने काल परमोच्य आनंद मिळवून दिला.
क्रिकेट मध्ये टाय होणारे सामने बोटावर मोजण्याइतके त्यात वर्ल्डकप मध्ये इनमिन चारच. वर्ल्डकपची सर्वात क्लोज फायनल 92 ची पाक इंग्लंड ज्यात यजमानांना सात धावाने पराभव पत्करावा लागला. म्हणजे  फायनल टाय होण्याचा विचार क्रिकेटने अद्याप केला नव्हता. पण क्रिकेटनियतीच्या मनात कोणती लहर आली देव जाणे. एकतर भारत ऑस्ट्रेलिया बाहेर गेल्यामुळे फायनलचे ऐश्वर्या रायचे ग्लॅमर जाऊन स्नेहा उल्लाळ झाले होते. आणि सर्वाना वाटत होते की किवीज फक्त लकच्या अन केनच्या जोरावरच फायनल मध्ये दाखल झाले आहेत. परवा भारताला हरवण्यापर्यंत त्यांच्या गोलंदाजीची दखल क्वचितच कोणी घेतली असेल. ब्रिटिशांचे जहाज पण हेलकावे खात किनाऱ्याकडे येत होते. कधी त्याचा टायटॅनिक होईल याची भ्रांत खुद इंग्लिश समर्थक पण देऊ शकले नसते. पण जन्माने आयरिश असणाऱ्या मॉर्गनच्या शिलेदारांनी वेगळ्याच इतिहासाची तयारी केली होती. भारत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला लिलया हरवत त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केला. आता त्यांची गाठ साखळीत वन साईडेड हरवलेल्या किवीज सोबत होती. इंग्लिश वृत्तपत्रे त्यांच्या खेळाडूंच्या तारीफांचे ओठ बांधू लागली कारण सगळ्यांना वाटत होते फायनल पण एकतर्फीच होईल.
पण आज क्रिकेटनियती समुद्र मंथनातील देव दानवाच्या खेळाची हायलाईट पहात असावी कारण आजच्या फायनल साठी त्यांना त्याहुन जास्त मोठी पटकथा लिहायची होती.

ग्रीनटॉप पिचवर टॉस जिंकुन बॉलिंग घ्यावी का बॅटिंग याचा विचार करताना चाणाक्ष केन पण थबकला. पण पारंपरिकता अंगात भिनवुन खेळणाऱ्या या जेटलमनने बॅटिंग स्वीकारली. मागच्या पुण्याईच्या जोरावर अख्खा वर्ल्डकप अन धोनीला आऊट केलेल्या थ्रोवर फायनल खेळणाऱ्या गप्टीलने सावध सुरवात केली. अंपायर तर इंग्लंडला जिंकवण्यासाठीच खेळत असावेत कारण काल चारवेळा त्यांनी इंग्लंडच्या बाजूने कौल दिला (निकोल्स lbw out... changed after DRS, Ross Taylor given out...Ball missing stumps, Roy not out... umpires call, and last over throw given 6 runs instead of 5) मान्य आहे ते पण माणुस आहेत पण सुधारणा नक्कीच झाली असती.
न्यूझिलंडने सावध सुरवात केली कदाचित मागच्या मॅचमध्ये कमी धावसंख्येचा केलेला यशस्वी बचाव त्यांना आत्मविश्वास देत असावा. अर्चर, वोक्स अन वुडला सामोरे जात विली अँड को. ने भक्कम पाया उभारला. एका विकेटच्या बदल्यात 21 षटकात शंभरी फायनल साठी नक्कीच स्फूर्ती देणारी पण मॉर्गनने चेंडु मधल्या षटकात मागच्या पाच वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून लौकिक मिळवलेल्या प्लंकेट कडे सोपवला आणि प्लंकेटने त्याचे काम केले. किवीच्या मजबूत आधारस्तंभला त्याने भगदाड पाडले पाठोपाठ अर्धशतकवीर निकोल्स आणि अनुभवी टेलर पण परतला. पुढचा भार प्रवाशाने भरलेल्या बेस्टच्या बस सारखे अडखळत लॅथम निशम आणि डी ग्रँडहोमने किवीजला 241 चा पल्ला गाठवला.
कोणत्या उपांत्य सामन्याची पुनरावृत्ती होते याची कुलबुल चाहत्यामध्ये लागली. न्यूझिलंड भारताविरुध्द केलेला पराक्रम करणार का इंग्लंड ऑस्ट्रेलियाला झोडून काढले तसे झोडणार? पण आज काहीतरी वेगळेच होणार होते. तिकडे जवळच विम्बल्डनवर दोन महान खेळाडु एकमेकाविरुध्द षड ठोकून उभे टाकले होते.
जेसन रॉय आणि जॉनी बेरस्टो च्या आक्रमणाला थांबवण्याची जबाबदारी केनने बोल्टकडे दिली. पहिल्याच चेंडूवर जोरदार अपील वन्स अगेन अंपायर्स कॉल. पण रॉय फार वेळ टिकला नाही रुटने त्याचा पाठलाग केला. मॉर्गन बेरस्टोने पण लगेच पॅव्हेलीयन गाठले. इंग्लंडची अवस्था चार बाद श्यानशी. पूर्ण इंग्लंड मध्ये शांतता इकडे फेडरर जोको अटीतटीची झुंज चालु होती.
 विश्वकपच्या पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेला स्टोक्सच्या मनात मात्र तीन वर्षापूर्वीचा तो दुःखद क्षण चालु होता. ब्रेथवेट्सच्या झंजवताने ब्रिटिशांचे दुसऱ्या T20 कपचे स्वप्न धुळीस मिळाले होते. त्या कटु स्मृतीवर पांघरन कधी घालता येईल याची सव्वा तीन वर्ष तो वाट पाहत असावा. न्यूझिलंड सोडुन इंग्लंड मध्ये स्थायिक होताणाच्या कटू आठवणी, बार मध्ये झालेली मारामारी, अपंग मुलाची केलेली चेष्टा आणि इंग्लिश बोर्डाने बेशिस्त वागणुकीबद्दल घातलेली 8 मॅचची बंदी. भारतात असता तर सोसिएल मीडियाने त्याचा केव्हाच बळी घेतला असता. मागच्या तीन वर्षात काय नको ते सर्व वाईट घडले पण त्यासाठी त्याला पश्चाताप झाला आणि पायश्चितपण घेतले. त्याच गोष्टींनी त्याच्यातल्या माणसाला घडवले आणि खेळाडु म्हणून कणखर बनवले. आज नियतीने त्याला संधी दिली आणि त्याने ती अचूक हेरली. बटलर सोबत 110 रन्सची पार्टनरशिप केली जोडी मॅच काढेल वाटतानाच बटलरने साथ सोडली. ख्रिस वोक्स पण लगेच परतला. जणु आऊट न होण्याचं अमृत पिऊन आलेला स्टोक्स अजून खेळत होता. निशमला लगावलेल्या शॉटवर चपळ बोल्टने कॅच घेऊन षटकार दिला. चांगला क्षेत्ररक्षक असणाऱ्या बोल्टने ही अक्षम्य चुक केली. पण प्लॅनकेट, अर्चर माघारी परतल्यामुळे खोलवर असणाऱ्या इंग्लिश बॅटिंगच्या मर्यादा उघड पडल्या.
शेवटच्या षटकात पंधरा धावा हव्या होत्या आणि समोर होता ट्रेंट बोल्ट. पहिले दोन चेंडु निर्धाव इंगलंडच्या गोटात खळबळ उडाली. रडावलेल्या चेहऱ्याने खिडकीतून पाहणारा रुट, काळजाची घालमेल करणारा मॉर्गन, मैदानावरची इंग्लिश फॅन्सची गंभीर शांतता जणु क्रिकेटला पहावली नाही. तिसऱ्या चेंडूवर मिडविकेटला षटकार आता समीकरण 3 मध्ये 9 आलेले. बोल्टने चौथा चेंडु फुल टॉस टाकला स्टोक्सने मिडविकेटला ढकलुन दोन साठी कॉल दिला बॉल गप्टीलकडे त्याने  लॅथमकडे अचुक थ्रो दिला. परवा त्याच्या थ्रोने सेमिफायनल गाठणाऱ्या न्यूझिलंडने अपेक्षा केली नसेल असे अघटित घडले. बॉल लॅथमकडे न जाता स्टोक्सच्या बॅटला लागुन चौकार, दोनच्या जागी सहा रन्स. स्टेडियममध्ये एकच जल्लोष. जिथे पाच रन्स दयायच्या तिथे कुमार धर्मसेनाने सहा रन्स दिल्या. पण ना केनने ना अन्य न्यूझीलंड खेळाडूंने आक्षेप घेतला. अंपायरचा निर्णय शेवटचा मानणाऱ्या फार कमी खेळाडुत ते येतात आणि हेच चांगले होणे त्यांच्यासाठी महागात पडले. मॅच इंग्लंडच्या आवाक्यात होती पण शेवटच्या दोन चेंडूत दोन रन दोन आऊट आणि मॅच अनपेक्षितरित्या टाय.
"वर्ल्डकप फायनल टाय"
तिकडे विम्बल्डनवर पाचवा सेट 12-12 होऊन टाय ब्रेकवर चालु होता.
आता क्रिकेटच्या सुपर ओव्हर चा थ्रिलर होता. पुन्हा स्टोक्स बटलर मैदानात, बोल्टच्या एका षटकात 15 धावा काढल्या. पूर्ण विश्वकप गोलंदाजाच्या जीवावर जिंकणाऱ्या Nz साठी हे खूप मोठे लक्ष होते पण जिमी निशम पावला त्याने लक्ष एका चेंडूत दोन धाव करुन कमान गप्टीलकडे दिली. सेमिफायनलची कड खेचणाऱ्या मार्टिनला हे लक्ष पार करायचे होते त्याने चेंडु डीप स्क्वेरला फटकावला पण रॉयने थ्रो केला त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा थ्रो. थ्रो तितका चांगला नव्हता पण बटलरने त्याचे काम केले. ड्राईव्ह मारुन पण गप्टील चांगलाच दूर राहिला,मॅच पुन्हा टाय पण वर्ल्डकप इंग्लडचा झाला काय तर बौन्ड्रीज जास्त होत्या. मान खाली टाकून गप्टील पिचवर बसला तिकडे केनच्या संयमी ह्रदयात पण आसवे गोळा झाली. देव पण शांत आणि संयमी व्यक्तीच्या आयुष्यातच जास्त दुःख देते. माझा जीव पण केनसाठी तळमळत होता. सलग दुसरे वर्ल्डकप फायनल किवीज हरली. पण केनने हसतमुखाने पराभव स्वीकारला आणि हाच त्याचा आणि न्यूझीलंडचा सर्वात मोठा विजय ठरतो. फेडररने पण अविश्वसनीय फायनल गमावली. मॅच हरून पण स्टेडियम फेडेक्सच्या नावाने गर्जत होते. खेळणे म्हणजे फक्त विजय नव्हे तर हारून पण जिंकता येते याचे अप्रतिम उदाहरण केनने आणि रॉजरने दाखवले. विराट, स्टोक्सच्या या युगात केन सारखे 'द्रविडी'मणी माळेत आहेत म्हणूनच क्रिकेटची महानता चमकत राहते. पण शेवटी दोन प्रश्न पडतात संपूर्ण विश्वकप मध्ये चांगली कामगिरी करणारा केन जर गप्टीलच्या जागी आला असता तर दोन रन्स सहज निघाल्या असत्या आणि  न्यूझिलंडने बौन्ड्रीज कमी मारल्या म्हणजे डॉट बॉल कमी खेळले मग चांगली स्ट्राईक रोटेट करणारा संघ हरला कसा??
   By Goro dated 15/06/2019

Comments